Saturday, 7 April 2018

ANC OPD बाबत खुले पत्र

                         प्रति,
  वैद्यकिय अधिकारी /आरोग्यसेविका /प्रसविका/आशा
  ग्रा.रू.मोखाडा/विक्रमगड
  प्रा.आ.केंद्र (जव्हार,विक्रमगड,मोखाडा )
  प्रा.आ.पथक,भरारी पथक,उपकेंद्र

विषय:माता मृत्यू ,उपजत मृत्यू,नवजात अर्भकमृत्यू कमी करण्यासाठी सहकार्य करणेबाबत

महोदय,
           माता मृत्यू ,उपजत मृत्यू,नवजात अर्भकमृत्यू कमी करण्यासाठी पतंगशाह कुटीर रूग्णालय कटीबध्द आहे,परंतु या साठी प्रा.आ.केंद्रांकडून आम्हाला योग्य ते सहकार्याची व समन्वयाची नितांत गरज आहे.जव्हार तालुक्यातील प्रा.आ.केंद्रांकडून नेहमीच सहकार्य मिळते.परंतु  दुर्देवाने मोखाडा व विक्रमगड येथिल प्रा.आ.केंद्रांकडून हे अपेक्षित  सहकार्य आम्हाला मिळत नाही. वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करून कुटीर रूग्णालयात आठवड्यातून तीन वेळा ANC OPD असते.सोमवारी सर्व नविन गरोदर मातांची  नोंदणी असते.मंगळवारी कमी जोखमीच्या मातांची पुनर्तपासणी असते तर बुधवारी फक्त जोखमीच्या मातांची तपासणी असते.सर्व प्रकारच्या म्हणजे कमी जोखमीच्या किंवा अतिजोखमीच्या मातांची  आमच्याकडची पहिली तपासणी ही सोमवारची असते.नंतर वर्गवारी करून आम्ही मातांना पुनर्तपासणीची तारीख ANC Paper वर लिहून देतो.आशा व आरोग्यसेविकांनी त्या तारखांनाच त्यांना पाठवावे.कोणत्याही वाराला पाठवून रूग्णांमध्ये संभ्रम  निर्माण करू नये.
          उपकेंद्र स्तरावर आरोग्यसेविकांकडून अतिजोखमीच्या मातांचे वेळेवर निदान केले जात नाही, आणि जरी निदान केले तरी त्यांना वेळेत व योग्य वाराला संदर्भित केले जात नाही.EDD/EPD चा आराखडा कागदावरच राहतो. ऐनवेळी प्रसूतीवेदना सुरू झाल्यावर या मातांना कुटीर रूग्णालय जव्हार येथे तडकाफडकी  पाठवले जाते.तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखा हा प्रकार आहे.नेमक्या या मातांमध्ये गुंतागुंत होऊन माता मृत्यू ,उपजत मृत्यू,नवजात अर्भकमृत्यू होण्याने प्रमाण जास्त आहे.
१) Severe Pre-eclampsia किंवा Eclampsia च्या रूग्णांना MgSo4 न देताच फक्त जिभेखाली Depine  देऊन संदर्भित केले जाते.शासकिय मार्गदर्शक सूचनानुसार अशा रूग्णांना Capsule Depine जिभेखाली (Sub lingually) न देता (Orally)तोंडाने पाण्या बरोबर घ्यायची असते.तसेच MgSo4 IV Loading नाही जमले तर किमान IM Loading 5-5 gram म्हणजे एकूण १० gram दोन्ही बाजूला कंबरेवर देणे अपेक्षित आहे.
२) Severe Anaemia च्या माता ज्यांच Hb 7 g % पेक्षा कमी असते त्यांना रक्त संक्रमण  (Blood Transfusion ) लागू शकते.असे रूग्ण रक्तांची उपलब्धता आहे की नाही याची खातरजमा केल्याशिवाय पाठवू नयेत.
३) Previous Cesarean, Short Stature CPD- Cephalopelvic disproportion किंवा वाटणारे रूग्ण यांना प्रसूतिपूर्व तपासणीसाठी किमान ३-४ भेटी देण्यासाठी पाठवावे.अशा मातांचे Elective Cesarean (म्हणजे ठरवून केलेली सिझेरियन प्रसूती) झाल्यास गुंतागुंत टळू शकते.
४) Anaemia च्या मातांना लवकर निदान करून जर Hb 6 किंवा 7 असल्यास IV Iron Sucrose मार्गदर्शक सूचनांनुसार द्यावे.6 gram पेक्षा कमी रक्त असल्यास मात्र रक्त संक्रमण हाच योग्य पर्याय असतो.
५) १८ वर्षाखालील किंवा ३० वर्षावरील माता या अतिजोखमीच्या माता असतात, प्रसूती वेळी त्यांना काहीही गुंतागुंत होऊ शकते.त्यांची आमच्याकडे  किमान चार वेळा तपासणी व दोनवेळा सोनोग्राफी करून घेणे अपेक्षित आहे.
६) Previous Abortion किंवा Previous Preterm या मातांना जर वारंवार वेळेआधी प्रसूती किंवा गर्भपात होत असेल तर चार महिने पूर्ण झाल्यावर गर्भपिशवीच्या तोंडावर टाका मारावा लागतो.म्हणून हे रूग्ण तिस-या महिन्यातच नोंदणीसाठी पाठवावेत.
७) LMP वरून Post date किंवा EDD निघून गेलेल्या  माता या जोखमीच्या माता असतात,त्यांना तात्काळ संदर्भित करण्यात यावे.सोनोग्राफीवरील तारखेवर विसंबून राहू नये.जर सोनोग्राफी तिस-या महीन्याआधी झाली असेल तरच त्यावरून आलेली EDD ही बरोबर असते.८ किंवा ९ व्या महिन्यात केलेल्या सोनोग्राफी वरून काढलेली EDD फसवी असते.
८) APH म्हणजे प्रसूतीपूर्व रक्तस्राव होणा-या माता या अतिजोखमीच्या माता असतात किमान २-३ रक्ताच्या पिशव्या असल्याखेरीज त्यांची प्रसूती करणे शक्य नसते.तरी या रूग्णांना रक्ताची उपलबधता ,भूलतज्ज्ञ व स्री रोगतज्ज्ञाची उपलब्धता असल्याची खात्री करूनच संदर्भित करावे.
९) PROM- Prelabour Rupture of membranes म्हणजेच Leaking PV-प्रसूतीवेदना सुरू होण्या आधी पाणी जाणे या मातांना प्रसूतीत गुंतागुंत उद्भवू शकते तरी त्याना IV Antibiotic देऊन लवकरात लवकर संदर्भित करावे.
१०) पायाळू गर्भ,आडवा गर्भ किंवा जुळे गर्भ या माताही अतिजोखमीच्या माता समजल्या जातात.तरी त्यांना  नियमित तपासणीसाठी पाठवावे
 तरी अतिजोखमीच्या किंवा जोखमीच्या मातांची सोनोग्राफी झाली म्हणजे सर्वकाही झाले अशा फसव्या निर्धास्तपणात आरोग्यसेविका किंवा आशांनी राहू नये .या मातांना नियमित तपासणी साठी पाठविणे हेही तितकेच गरजेचे आहे.
ग्रामीण रूग्णालयातील अधिका-यांनी अतिजोखमीच्या माता संदर्भित करण्याआधी फोन करून सूचित करावे.
पतंगशाह कुटीर रूग्णालय हे Medical College किंवा Civil Hospital ऐवढे अद्ययावत नाही.येथे १ भूलतज्ज्ञ व १ स्रीरोग तज्ज्ञ असले तरी ते दोघे २४ तास प्रसूतीगृह किंवा शस्रक्रियागृहातच उपस्थित रहात असतील अशी समजूत करून घेऊ नये.
             तेव्हा अतिजोखमीच्या मातांचे निदान आरोग्यसेविका किंवा वैद्यकिय अधिकारी यांच्याकडून लवकर झाले व त्यांना संदर्भसेवा लवकर मिळाली तर त्यांची प्रसूती योग्य ते नियोजन करून करणे आम्हाला शक्य होईल. अशा मातांच्या किमान ४-५ तपासण्या व २ सोनोग्राफी तरी कुटीर रूग्णालयात व्हायला हव्यात ,सदर जबाबदारी आशावर सोपवावी.अन्यथा आम्हाला या मातांना प्रसूती साठी जिल्हा रूग्णालयात संदर्भित करावे लागेल.कमी जोखमीच्या मातांची नियमित तपासणी उपकेंद्र किंवा प्रा.आ.केंद्रातच करायला हरकत नाही.जर त्यांना प्रसूतीवेळी काही अडचण उद्भवली तर त्यासाठी ऐनवेळी संदर्भसेवा द्यावी लागते हे समजण्यासारखे आहे.परंतु जोखमीच्या व अतिजोखमीच्या मातांच्या कुटीर रूग्णालय जव्हार येथे तपासणीबाबत सर्व आरोग्यसेविका,आशा व अधिका-यांनी सतर्क राहीले तर आणि तरच आपण  माता मृत्यू ,उपजत मृत्यू,नवजात अर्भकमृत्यू कमी करू शकू.


No comments:

Post a Comment

प्रसूतीपश्चात तांबी कार्यक्रमाची तोकडी लांबी

                     फार पूर्वी म्हणजे मध्ययुगीन काळात अरब व्यापारी लोक एका वाळवंटी प्रदेशातून दुस-या प्रदेशात आपल्याकडील उंटांच्या ताफ्यासह...