Monday, 12 October 2020

संदर्भसेवेची ऐशी तैशी

     सध्या कोरोना महामारीचा कठीण काळ सुरू आहे.कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येचा आरोग्यसेवेवर अतोनात भार आहे.तितकाच भार Non Covid संस्थांवर आहे.आधीच आपल्या जिल्ह्यात जिल्हा रूग्णालय नाही.त्यात शेजारच्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हा रूग्णालय कोविड रूग्णालय झालेले आहे.तसेच जिल्ह्याला लागून असलेल्या दादरा नगर हवेली व दिव दमन या केंद्रशासित प्रदेशातील सिलवासा जिल्हा रूग्णालयात आपल्या जिल्ह्यातून संदर्भित केलेले रूग्ण नाकारले जातात.त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही उपजिल्हा रूग्णालयांवर अतोनात ताण आलेला आहे.या तिन्ही रूग्णालयापैकी जव्हारला SNCU व Blood Bank असल्यामुळे वसई विरार वगळता संपूर्ण जिल्ह्यातला प्रसूतीच्या माता व कमी वजनाची किंवा अत्यवस्थ नवजात अर्भके जव्हारला हक्काने पाठवली जात आहेत.परिस्थितीची अपरिहार्यता लक्षात घेता यात काही वावगे नाही.परंतु संदर्भसेवा देताना पाळावयाच्या किमान नियमांचे मात्र दुर्देवाने कोणीही पालन करताना दिसत नाही.

          जव्हार हे प्रथम संदर्भसेवा रूग्णालय आहे, द्वितीय किंवा तृतीय संदर्भसेवा रूग्णालय नाही.येथे असलेले बालरोग तज्ज्ञ , प्रसूती तज्ज्ञ किंवा भूलतज्ज्ञ २४ x ७ रूग्णालयातच काम करत असतील अशी आशा बाळगणे अवास्तव आहे.कारण कोविड रूग्णालयासाठी आधीच रुग्णालयातील निम्मे वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर गेले आहेत.त्यामुळे Emergency Casualty Duty करून आपापल्या विभागाचे कामसुध्दा या तज्ज्ञाना करावे लागत आहे.Blood Bank मध्ये पुरेसा रक्तसाठा प्रत्येकवेळी असतोच असे नाही.SNCU ची क्षमता फक्त २८ वार्मरचीच आहे.तरीही रोज किमान ३५-४० बालके भरती असतात.प्रसूतीकक्षाची क्षमता २० खाटांची आहे तिथे SNCU च्या धरून किमान ४०-५० माता भरती असतात.Operation Theatre साठी एकच परिचारिका व एकच परिचर आहे.त्यांना दर दिवशी २४ तासांची Duty लावणे शक्य नाही. याबरोबरच जव्हारला Physician ,Surgeon व ICU ची सेवा उपलब्ध नाही.सध्य स्थितीत क्षमतेपेक्षा  दुप्पटीने रूग्ण भरती असतात.

    तसेच भौगोलिक दृष्या जव्हार दुर्गम भागात आहे.येथे उपचार न होऊ शकणारे रूग्ण येथून ८० किलोमीटर दूर असलेल्या नाशिक जिल्हा रूग्णालयात पाठवावे लागतात.म्हणजे एखादा वाडा, तलासरी,कासा,डहाणू,बोईसर ,मनोर किंवा पालघरचा रूग्ण जर जव्हार हून नाशिकला संदर्भित करणे अंतराच्या. व रूग्णाच्या सोईच्या दृष्टीने खूपच Inconvenient आहे.कारण इकडच्या रूग्णांना ठाणे किंवा मुंबई येथे संदर्भित होणे जास्त सोईस्कर आहे.या सर्व बाबी लक्षात घेता आपण पाठवलेला रूग्णाची जव्हारला Management होऊ शकते का याची खातरजमा करून घेणे अगत्याचे आहे.तसेच एकाचवेळी जोखमीच्या ५-६ माता प्रसूतीसाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून संदर्भित झाल्यास त्यावर Management करणारा तज्ज्ञ एकटाच असल्यावर व्यवस्थित उपचार करणे खूप कठीण होते.

    १५ दिवसांपूर्वीची घटना आहे.एक गरोदरपणाचा ८ वा महिना लागलेली Placenta Previa हे निदान असलेली माता रक्तस्राव होतोय म्हणून उपजिल्हा रूग्णालय कासा येथे गेली.परंतु ती विक्रमगड तालुक्यातली होती, म्हणून कासाच्या डाक्टरांनी तिला ग्रामीण रूग्णालय विक्रमगडला पाठवले.(म्हणजे उपजिल्हा रुग्णालयातून ग्रामीण रूग्णालयात).ग्रामीण रूग्णालय विक्रमगडच्या अधिका-यांनी तिला जव्हारला संदर्भित केले.जव्हारला स्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत का ? किंवा असा actively bleed होणारी रूग्ण Treat करताना तिच्या गटाचे पुरेसे Blood(Packed Cells किंवा FFP) आहे का? याची काहीच खातरजमा केली नाही. वास्तविक Placenta Previa (APH-Antepartum Haemorrhage)च्या रूग्णाला ICU back up, adequate blood product व General Anaesthesia Facility या सर्व गोष्टी लागतात ज्या जव्हारला नाहीत. तसेच नेमके त्या दिवशी स्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नव्हते. रूग्णवाहीका सुध्दा उपलब्ध नव्हती.(२ रूगणवाहीका प्रसूतीचे रूग्ण घरी सोडण्यासाठी गेलेल्या होत्या) परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ,जव्हारच्या Casualty Medical Officer नी तात्काळ संदर्भसेवा देण्यासाठी म्हणून या रूग्णाला विक्रमगडच्या रूग्णवाहीकेने नाशिकला घेऊन जाण्यास सांगितले.वाढीव अंतराच्या इंधनासाठी निधी देऊ केला.परंतु विक्रमगडच्या ड्रायव्हरने रूग्ण नेण्यास नकार दिला.शेवटी जव्हारचीच एक नादुरूस्त रूग्णवाहीका कशीबशी सुरू करून हळू हळू या रूग्णाला नाशिकला पोहोचवण्यात आले.दरम्यान खूप तिला रक्तस्राव झाला होता .तिला नाशिक जिल्हा रूग्णालयात 2 packed cell व 4 FFP देऊन Emergency Cesarean करून तिचा जीव वाचवाल गेला.कमी वजनाचे बाळ वाचू शकले नाही.संपूर्ण Referral Process पूर्ण होण्यासाठी एकूण ६-७ तास लागले.हा वेळेचा अपव्यय टाळतां आला नसता का? कासा किंवा विक्रमगड वरून ही रूग्ण दिड दोन तासात ठाण्याला (छत्रपती शिवाजी रूग्णालयात) किंवा मुंबईला  पोचवता आली नसती का? पण हा सारासार विचार न करता ,अत्यवस्थ रूग्ण आपल्या हास्पिटलमधून ऐनकेन प्रकाराने दुस-या हास्पिटला पाठवणे एवढेच आपले कर्तव्य आहे असे मानून कसे चालेल? रूग्ण कुठे नीट Management होईल याचाही थोडा विचार करायला नको का? सुदैवाने ही रूग्ण वाचली म्हणून ठिक नाही तर किती गंभीर प्रसंग ओढवला असता? 

    तरी याचा सर्वांनी गांभीर्याने दखल घ्यावी व सारासार विवेकबुध्दी वापरून रूग्ण संदर्भित करताना योग्य ती काळजी घ्यावी एवढीच माफक अपेक्षा.     


No comments:

Post a Comment

प्रसूतीपश्चात तांबी कार्यक्रमाची तोकडी लांबी

                     फार पूर्वी म्हणजे मध्ययुगीन काळात अरब व्यापारी लोक एका वाळवंटी प्रदेशातून दुस-या प्रदेशात आपल्याकडील उंटांच्या ताफ्यासह...