Wednesday, 13 December 2017

सिझेरियनची सक्ती

                        सिझेरियन प्रसूती (Cesarean Section) म्हणजे जेव्हा योनीमार्गाव्दारे स्वाभाविक प्रसूती शक्य नसेल , तेव्हा पोटावर व गर्भाशयावर चीर देऊन २८ आठवड्यांच्या वर वाढ झालेल्या गर्भाला बाहेर काढणे. प्रसूती दरम्यान मातेच्या किंवा बाळाच्या जीवाला धोका निर्माण होणे हे सिझेरियन करण्याचे मुख्य कारण  होय.सिझेरियन प्रसूतीचे अनेक ऐतिहासिक संदर्भ भारत व जगातील इतर देशात मिळतात.बिंदुसार(मौर्य वंशाचा दुसरा राजा) याचा जन्म त्याच्या आईने चूकून विष प्यायल्यामुळे चाणक्याने पोटावर चीर देऊन केला,अशी आख्यायिका आहे. या शस्रक्रियेस सिझेरियन का म्हणतात याच्याही अनेक दंतकथा आहेत.रोमचा राजा जुलियस सीझर याचा जन्म अशाप्रकारे झाला अशी आख्यायिका आहेत.परंतु जुलियस सीझरची आई त्याच्या जन्मानंतर बरेच वर्ष जगली, त्याकाळातील सिझेरियन नंतर रूग्ण जीवंत राहणे हे अशक्यप्राय होते. सिझेरियन शब्दाचा उगम रोमच्या न्युमा पाम्फिलस या राजाने ख्रिस्तपूर्व ७१५ साली केलेल्या लेक्स रेजिया ( Lex Regia) या कायद्यामुळे  झाला असावा. या कायद्यानुसार जर गर्भवती स्री मृत्यू पावली तर तिचा अंत्यविधी करण्याआधी तिच्या पोटावर चिर देऊन बाळ बाहेर काढून नंतर दोघांचे दफन केले जात असे.हा कायदा रोमवर सीझर राजे राज्य करत असताना सुध्दा अस्तित्वात राहीला. चीन,इराण व युगांडा वगैरे देशातील पुरातन ग्रंथात सिझेरियन प्रसूती होत असल्याचे दाखले सापडतात.अगदी १८ व्या शतकापर्यंत सिझेरियन झाल्यावर मातेचा मृत्यू अटळ असे.परंतु १९व्या शतकाच्या शेवटापासून आजपर्यंत हळहळू सिझेरियन करण्याची पध्दती,रक्त संक्रमणाची सोय, सुधारित प्रतिजैविके,निर्जंतुक साधने,भूल द्यायच्या पध्दती या सर्वामध्ये आमुलाग्र बदल होत गेला .त्यामुळे मातामृत्यूचे प्रमाण कमी झाले.आणि आज तर सिझेरियन ही प्रजनन काळामधल्या वयोगटातील स्त्रियांवर नेहमी होणारी शस्रक्रिया आहे. आज विकसित देशात १०० प्रसूतींमागे २५ ते ३० सिझेरियन होतात.भारतात (DLHS-3 Data नुसार) १०० प्रसूतीमागे सरकारी रूग्णालयात १२ आणि खाजगी रुग्णालयात २८ सिझेरियन होतात.महाराष्ट्रात हे प्रमाण अनुक्रमे १० (सरकारी) नि २० (खाजगी) असे आहे.तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ७% तर शहरी भागात १७% एवढे सिझेरियनचे प्रमाण आहे.
    सिझेरियन करायची प्रमुख कारणे म्हणजे
वार खाली असणे (Placenta Previa),
मातेच्या कंबरेच्या हाडांची पोकळी लहान असणे (Cephalopevic  Disproportion)
बाळाची अस्वाभाविक स्थिती (Breech,Brow,Face,Occiput posterior,Transverse Lie )
नाळ बाहेर येणे (Cord Prolapse),
संगर्भापस्मार- मातेला फिट येणे व रक्तदाब वाढणे (Eclampsia),
वार सुटून प्रसूतीपूर्व रक्तस्राव होणे (APH- Abrutio Placenta),
आधीचे सिझेरियन (Previous Cesarean),
पाणी कमी असणे (Severe  Oligohydramnios),
बाळाचे ठोके कमी होणे किंवा बाळाने संडास करणे (Foetal distress)
लांबलेली प्रसूती (Prolonged Labour)
अडलेली प्रसूती (Obstructed Labour)
     वरील सर्व वस्तुस्थिती लक्षात घेता आपल्याकडे सिझेरियन प्रसूतीची टक्केवारी ७% असणे अपेक्षित आहे.परंतु आपल्याकडे होणा-या एकूण प्रसूतीपैकी ५०% बालके ही २.५ किलोपेक्षा कमी वजनाची असतात.म्हणजे CPD या कारणासाठी होणा-या सिझेरियनचे प्रमाण ५०% ने कमी होते.तसेच गेल्या १० वर्षात मागील दोन वर्षे वगळता नियमित भूलतज्ज्ञ नसल्यामुळे आधी सिझेरियन झालेल्या रूग्णांचे ( Previous Cesarean चे ) प्रमाण अत्यल्प आहे. पर्यायाने Previous Cesarean या कारणासाठी होणारे Cesarean सुध्दा कमीच आहेत.तसेच गेल्या ४-५ वर्षात जव्हारमधील   प्रा.आ.केंद्रात मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत Regular ANC Check up होत असल्यामुळे व कुटीर रूग्णालयात आठवड्यातील तीन दिवस ANC Clinic ची सेवा उपलब्ध असल्यामुळे जोखमीच्या मातांचे वेळेत निदान व उपचार होतात.Eclampsia, Pre eclampsia, Postdate, IUGR,PROM  असलेल्या मातांचे  आपल्याकडे योग्य वेळेवर
Oxytocin व Misoprostol वापरून Induction of Labour केल्यामुळे स्वाभाविक प्रसूती जास्त होतात. Previous Cesarean चे  Nonrecurrent Indication असलेले रूग्ण  कधी कधी Advanced Labour मध्ये येतात  व स्वाभाविक प्रसूती होऊन जाते.बहुप्रसवा  पायाळू बाळ असलेल्या माता (Multigravida Breech) सहजपणे स्वाभाविक प्रसूत होतात.अगदी Primigravida Breech सुध्दा जर बाळाचे वजन २.५ किलोपेक्षा कमी असेल तर व्यवस्थित पणे प्रसूत होतात.येथिल माता कष्टाळू,काटक व सहनशील असल्यामुळे प्रसूती दरम्यान जोर (bear down) व्यवस्थित करतात. या सर्व बाबींमुळे साहजिकच येथे सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण अत्यल्प व स्वाभाविक प्रसूतींचे प्रमाण जास्त जास्त आहे.
     सिझेरियन प्रसूती हा स्वाभाविक व नैसर्गिक  प्रसूतीला पर्याय जरूर आहे. मानवाने निसर्गाच्या किती विरूध्द जायचे यालाही मर्यादा असते. म्हणून हा पर्याय जेव्हा स्वाभाविक प्रसूतीमुळे जर माता किंवा अर्भकाच्या जीवाला धोका उद्भवणार असेल तरच निवडायला हवा. केवळ डाक्टरांच्या किंवा रूग्णांच्या सोईसाठी सिझेरियन करणे किती योग्य आहे ? स्वाभाविक प्रसूतीपेक्षा सिझेरियन प्रसूतीमध्ये मातेच्या जीवाला जोखिम खचितच जास्त आहे.शिवाय एकदा सिझेरियन झालेली माता दुस-या खेपेला अतिजोखमीची माता म्हणून ओळखली जाऊन तिच्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. म्हणून प्रत्येक मातेच्या प्रसूती दरम्यानच्या अवस्थेवरून (Clinical Condition वरून)  सिझेरियन करायचा निर्णय घ्यायचा की सरसकट टक्केवारीच्या मोजपट्टीचा नियम सगळ्या मातांना लावून सिझेरियनची सक्ती  करायची हे आपापल्या सद्सदविवेकबुध्दीलाच विचारलेलेच बरे .

Sunday, 15 October 2017

ग्रामीण रूग्णालय मोखाडा -एक अधोगती

                         साधारणत: २००४-५ सालचा काळ.ग्रामीण रूग्णालय मोखाड्यात नियमित वैद्यकिय अधिक्षक धरून तीन डाक्टर होते.अधिक्षक डा साबदे- भूलरोगतज्ज्ञ,डा कडवेकर -बालरोगतज्ज्ञ आणि डा एक अस्थाई डाक्टर होत्या.नेहमीच्या रूग्णांच्या उपचारा व्यतिरिक्त साबदे सर Minilap TL करायचे. Laparoscopic TL चे कॅम्प सुध्दा ठेवले जायचे.नियमित प्रसूती व्हायच्या.फक्त गुंतागुंतीचे रूग्णच जव्हार किंवा नाशिकला संदर्भित व्हायचे.अधिक्षक स्वत: एक कडक व कुशल प्रशासक होते.पूर्ण रूग्णालयावर त्यांचा वचक तर होताच,शिवाय त्यांनी काही कालावधीसाठी कुटीर रूग्णालय जव्हारचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता.
ग्रामीण रूग्णालय मोखाड्याच्या इतिहासातला हा सर्वोत्तम कालावधी असावा.२००९ पर्यंत एकेक करून वरील तिन्ही डाक्टर बदली होऊन गेले.तिथून या रूग्णालयाची जी अधोगती सुरू झाली ती आजतागायत चालू आहे.                            
       गेल्या ८-९ वर्षात एका पेक्षा एक बेजबाबदार व नाठाळ अधिकारी व कर्मचारी या रूग्णालयाच्या नशिबात आले.पर्यायाने इथल्या रूग्णांची खूपच ससेहोलपट झाली.इथल्या खेड्यातला समाज तसा नागरी जीनवशैलीशी एकदम अनभिज्ञ,मधल्या काळात मोबाईल व टिव्ही मुळे त्यांची थोडीफार बाहेरच्या जगाशी ओळख झाली. तसे चांगले शिकलेले पदवीधर व चांगल्या पदावर नोकरी करणारे स्थानिक लोक आहेत खरे,परंतु ते संख्येने कमी आणि नोकरीसाठी बाहेर असतात.उरलेले अर्धशिक्षीत इकडेच कसेबसे दिवस काढतायत.त्यातल्या थोड्याफार हुशारांनी पत्रकारिता हा व्यवसाय म्हणून स्वीकारला आणि ज्यांना काहीच जमले नाही ते राजकारणात गेले.मोखाडा गावातल्या (माफ करा त्याला शहर नाही म्हणता येणार) लोकांबद्दल तर उपहासाने असे म्हटले जाते की मोखाड्याच्या प्रत्येक घरात वकील ,पत्रकार किंवा राजकारणी जन्माला येतात.यातील उपहासाचा भाग जरी सोडला तरी येथिल सगळेच नसले तरी बहुतांश लोक दुर्देवाने उर्मट व उध्दटपणासाठी कुप्रसिध्द आहेत.समाजाचे नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये असतात, समाजात वावरताना काही जबाबदारी असते याचे त्याना भान नाही.परंतु स्वत:चे न्याय हक्क मिळवण्यासाठी सनदशीर मार्गापेक्षा दंडेलशाहीवर त्यांचा जास्त विश्वास असतो.कुठल्याही सरकारी कार्यालयात किंवा अगदी सरकारी रूग्णालयात सुध्दा राजकिय पुढा-यांच्या ओळखी किंवा वशिल्याशिवाय काम होत नाही असा त्यांचा ठाम समज आहे.म्हणूनच की काय पण राजकिय हस्तक्षेपामुळे कोणी चांगला कर्मचारी टिकत नाही आणि चांगले कर्मचारी नसल्यामुळे ओघानेच राजकिय हस्तक्षेप वाढतो हेच दुष्टचक्र येथे चालू आहे.बरे राजकिय शिरजोरीमुळे व अरेरावीमुळे येथिल पायाभूत सोईसुविधा वाढल्या असेही नाही.मोखाडा गावातील बसस्टॅंड असो किंवा आसे-बेरिस्ते या गावाकडे जाणारा रस्ता असो, गेल्या २५ वर्षापासून जैसे थे याच अवस्थेत आहे.नाही म्हणायला घरांची संख्या किंवा दुकांनाची संख्या वाढली असावी.हे असे कमालीचे निराशाजनक वातावरण येथे भरलेले आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ जोपासणारी मंडळी कुठलाही प्रश्न विधायकपणे कसा सोडवता येईल यात आपला उर्जा खर्च करण्यापेक्षा तो प्रश्न जास्त ज्वलंत भासविण्याचा किंवा भडकवण्याचा जास्त प्रयत्न करतात.
                     वरील सर्व पार्श्वभूमीमुळे येथे बदलीने येणारे सरकारी नोकर स्वेच्छेने बदलून आलेले नसतात.नविन पोस्टींग किंवा प्रशासकिय कारवाईने त्यांना नाईलाजास्तव येणे भाग पडते.किंवा नाशिकहून रोज अपडाऊन करायला सोईस्कर हा त्यांचा हिशोब असतो.ग्रामीण रूग्णालयात चूकून कोणी चांगला कर्मचारी किंवा अधिकारी आला तरी टिकत नाही.कारण इथली व्यवस्थाच ऐवढी कुचकामी झाली आहे की एकटा दुकटा माणूस ती बदलूच शकणार नाही.इथल्या कामाचा दर्जा पाहता या संस्थेची अवनीती (Degradation) करून जर ग्रामीण रूग्णालयाचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर केले तर नक्कीच आता होत असलेल्या कामापेक्षा दुप्पट काम होईल.किंवा Rural Hospital ऐवजी Referring Hospital हे नाव सयुक्तिक राहील.CMO (Casualty Medical Officers) ऐवजी TMO (Traffic Medical Officer)हे पदनाम सुयोग्य राहील.PHC किंवा Subcenter वरून संदर्भित होऊन आलेला रूग्ण SDH ला पाठविणे हे यांचे ऐकमेव महत्वाचे काम असावे.गावखेड्यातल्या दाई किंवा भगत या डाक्टरांपेक्षा जास्त कुशलतेने व प्रामाणिकपणे काम करतात.कधी कधी तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेतून आलेला रूग्ण गाडीच्या खाली सुध्दा उतरवला जात नाही. तसाच परस्पर त्याच वाहनातून उपजिल्हा रूग्णालय किंवा जिल्हा रूग्णालयला पाठवला जातो. पाट्या टाकण्याची हद्द यापेक्षा काय असू शकते.संदर्भसेवा बळकट केली ती अशा निष्क्रिय ग्रामीण रुग्णालयांनी.रूग्णसेवेबद्दल तर विचारायलाच नको. स्वाभाविक प्रसूती,अतिसार,मलेरिया,न्यूमोनिया ,विषमज्वर ,सर्पदंश,विंचूदंश या आजारांवर जर येथे उपचार होणारं नसतील तर ग्रामीण रूग्णालये हवीतच कशाला? फक्त सर्दी पडशाचे रूग्ण तपासायला? किरकोळ सर्दी पडशावर PHC तल्या ANM किंवा MPW सुध्दा उपचार करतात.  एकीकडे आपण 10 वी पास ही शैक्षणिक पात्रता असलेल्या ANM ला  कुशल बनविण्यासाठी Neonatal Resustation  किंवा Skilled Birth Attendant वगैरे  शिकवून प्रशिक्षित करत आहोत. तर  दुसरीकडे या RH च्या नावाला  MBBS  किंवा तत्सम पदव्युत्तर शिक्षण झालेल्या डाक्टरांचे गंजलेले ज्ञान  Septran, PCM, CPM च्या पुढे जात नाही.किंबहुना त्यांनाच नविन शिकायची इच्छा नाही.
   वर्षानुवर्षे हे चालू आहे आणि असेच चालू राहिले तर  मोखाडा आणि त्यांचे ग्रामीण रूग्णालय  पुढील ५० काय १०० वर्षात तरी सुधारेल का?

Sunday, 24 September 2017

१०८ चा पांढरा हत्ती

                              गेल्या चार वर्षांपासून आपल्याकडे १०८ ही विशेष रूग्णवाहीका सेवा सुरू झाली आहे.या रूग्णवाहीकेचे वैशिष्टय म्हणजे रूग्ण रूग्णालयात संदर्भित करत असताना डाक्टर सोबत राहतील.ही रूग्णवाहीका Oxygen,Emergency Medicine, Pulse Oximeter  व छोट्या ventilator आदी सुविधांनी सुसज्ज असणे अभिप्रेत आहे.अत्यवस्थ व गंभीर आजाराच्या रूग्णांची संदर्भित होत असताना हेळसांड होऊ नये हा यामागे मूळ हेतु आहे.शिवाय रात्री अपरात्री घरून विशेषत: लांबच्या खेड्यापाड्यातून रूग्णालयात येण्यासाठी वाहन मिळणे दुरापास्त,अशा वेळी कोणालाही डाक्टरांसह रूग्णवाहीका घरी येऊन रूग्णाला रूग्णालयात घेऊन जाणे म्हणजे ही पाश्चात्त्य किंवा विकसित देशातील तत्पर व अद्ययावत रूग्णवाहीका सेवे सारखी आकर्षक सेवा वाटेल.जवळपास सर्वच तालुक्यात किमान दोन ॲम्ब्युलन्स मिळाल्या आहेत.अतिदुर्गम भागाला विशेष प्राधान्य दिले गेले आहे.पण खरच या सेवेमुळे संदर्भ सेवा बळकट झालीय का? या ॲम्ब्युलन्सवर असणा-या डाक्टरांचा खरच काही उपयोग होतो का?
    दुर्देवाने वस्तुस्थितीत विशेष काही फरक पडलेला नाही.पहिली गोष्ट म्हणजे १०८ नंबर वर फोन केल्यावर तो लागेलच याची हमी नसते.लागलाच तर समोरून सीबीआय सारख्या तपास यंत्रणा
सुध्दा विचारत नसतील ऐवढे चिकित्सक प्रश्न विचारले जातात.त्यांनंतर उपलब्ध असलेल्या जवळच्या  रूग्णवाहीकेच्या डाक्टरांशी बोलणं करून देण्यासाठी किमान १५ मिनिट किंवा कधी कधी ३० मिनटे प्रतिक्षा करावी लागते.तस पाहील तर डाक्टरांशी संपर्क होणे हे काम फक्त ५ मिनीटात व्हायला हवे.बरेचदा ॲम्ब्युलन्स रूग्णालयाच्या आवारातच असते.रूग्णवाहीकेचा चालक आसपासच दिसतो ,मग नेमके डाक्टर कुठे गडप झालेले असतात कुणास ठाऊक? की ज्यामुळे त्यांच्याशी संपर्क व्हायला १५-२० मिनिटे लागावीत ? डाक्टरांशी संपर्क झाल्यावर मग अमुक ठिकाणीच का न्यायच आहे,तमुक ठिकाणी का नाही? बेड बुक केला आहे का? सिव्हील सर्जनची सही आहे का ? असे अडथळावजा प्रश्न या डाक्टरांकडून विचारले जातात.मुळात या डाक्टरांच्या कुवतीवर शंका घेण्यास वाव आहे.या सेवेवर भरती केलेले डाक्टर आयुर्वेदाचे आहेत. त्यांच्या पथीबाबत आक्षेप असायचे कारण नाही.पण केवळ प्रॅक्टिस करून ज्यांचा उदरनिर्वाह होत नाही,मुख्यत्वे त्यांनीच ही १०८ ची नोकरी जोडधंदा म्हणून पत्करली आहे.  त्यांना रूग्ण संदर्भित करत असताना अत्यवस्थ रूग्णांवर उपचार (Emergency Medical Services )करायचे विशेष वेगळे प्रशिक्षण वगैरे दिल्याचे ऐकिवात नाही.किंबहुना त्यांना दिलेल्या Emergency Medicine चे account तपासल्यास ९९% औषधी या वापरल्या गेल्या नसतील याची १००%  खात्री बाळगण्यास काहीच हरकत नाही.मुळात रूग्ण संदर्भित करत असताना त्यातही विशेष करून गंभीर आजार असलेल्या रूग्ण संदर्भित करत असताना डाक्टरांनी रूग्णासोबत बसणे अपेक्षित आहे.मात्र जवळपास सर्वच डाक्टर रूग्णवाहीकेत पुढे ड्रायव्हर शेजारी बसतात.म्हणजे रूग्ण डाक्टरांच्या देखरेखीखाली संदर्भित होणे या पहिल्या उद्देशालाच हरताळ फासला जातो.जर प्रत्येक रूग्णाबाबत असे होत असेल तर मग प्रत्येक रूग्ण वाहीकेवर २-३ डाक्टर नेमण्याची व त्यांच्या वेतनावर ख्रर्च करण्याची काहीच गरज नाही.काही महाभाग तर रूग्णासोबत जातच नाहीत.विशेषत: रूग्ण जर घरून आणायचा असेल तर ड्रायव्हलाच पाठवतात.रूग्णाला रूग्णालयाजवळ आणल्यावर मग रूग्णवाहीकेत चढतात.तर काही महाराजांना अत्यवस्थ रूग्ण घेण्यासाठी रूग्णालयात येणेही जीवावर येते.त्यांचे ड्रायव्हर पहिल्यांदा रूग्ण गाडीत चढवून घेतात व नंतर डाक्टरांना त्याच्या घरी आणायला अम्ब्युलन्स घेऊन जातात.काही जण तर यापेक्षाही सुपीक डोक्याचे असतात.लांबच्या रूग्णालयात न्यायचा रूग्ण थेट संदर्भित केलेल्या रूग्णालयात न नेता मार्गावरील मधल्या गावातील एखाद्या दुस-या १०८  च्या रूग्णवाहीकेला सोपवून येतात.त्यांच्या भाषेत रूग्णाला दुस-या १०८ मध्ये रिले (Relay)करतात.यात Serious असलेल्या रूग्णाचे विनाकारण चढण्या उतरण्यामुळे अतोनात हाल होतात.
   प्रसूती झालेले रूग्ण,कुटुंब कल्याण शस्रक्रिया झालेले रूग्ण घरी सोडण्यासाठी या १०८ सेवेचा काडीचाही उपयोग होत नाही. Call नसताना OPD च्या वेळेत डाक्टरांनी रूग्णालयात थांबून OPD ला मदत करावी असे वरिष्ठांचे आदेश सोईस्करपणे धाब्यावर बसवलेले आहेत.दुसरा अनिष्ट परिणाम म्हणजे ज्या प्रा.आ.केंद्रांना जवळ १०८ ची सुविधा उपलब्ध आहे ,त्यांनी रात्री आलेले सरसकट सगळे रूग्ण १०८ मध्ये बसवून RH किंवा SDH ला संदर्भित करायचे असतात असाच ठाम समज करून घेतला आहे.त्यामुळे PHC वरून अनावश्यक रेफरल वाढले आहेत.अजून एक दुष्परिणाम म्हणजे रात्री अपरात्री संदर्भसेवेसाठी १०८ असते, या गृहीतकामुळे SDH किंवा RH चे ड्रायव्हर रात्री सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.कधी कधी तर  रूग्णालयाच्या आवारात ४-५ ॲम्ब्युलन्स दिसतात परंतु रूग्णासाठी एकही ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही.म्हणजे असून अडचण नसून खोळंबा.
SDH च्या रूग्णवाहीकांबाबत निदान वैद्यकिय अधिक्षक जबाबदार असतात.त्याबाबत वरिष्ठांकडून नियमित लेखापरिक्षण होते.पण १०८ बाबत तर कुणाकडे काही तक्रार करायची सोय नाही.कारण यांचे कंत्राट खाजगी कंपनीस दिलेले आहे. त्यामुळे १०८ च्या District Manager ला manage करून काहीही क्षुल्लक कारण दाखवून गाडी बंद दाखवायची नि घरी झोपा काढायच्या असे प्रकार वारंवार होतात. यावर जालीम उपाय म्हणजे या डाक्टर व ड्रायव्हरांना संदर्भित केलेल्या रूग्णसंख्येनुसार किंवा गाडीने कापलेल्या अंतरानुसार जर वेतन दिले तरच १०८ या रूग्णवाहीका सेवेचे काम सुरंळीत व पूर्ण क्षमतेने होईल.नाहीतर बिनकामाचा हा पांढरा हत्ती पोसणे कठिण जाईल.          

Tuesday, 5 September 2017

सोनोग्राफीच वेड

              गेल्या दिड वर्षापासून आपल्या जव्हार कुटीर रूग्णालयात सोनोग्राफीची सुविधा सुरू झाली. येथिल रूग्णांची गरज लक्षात घेऊन आरोहण या संस्थेमार्फत सिमेन्स या कंपनीकडून सोनोग्राफीचे मशिन दान करण्यात आले.नंतर त्यांनी सतत पाठपुरावा करून नाशिकहून आठवड्यातील एक दिवसासाठी सोनोग्राफी तज्ज्ञाची सोय करण्यात आली.जव्हार,विक्रमगड व मोखाडा येथिल गरोदर मातांची दर बुधवारी कुटीर रूग्णालयात सोनोग्राफीसाठी झुंबड उडते.कधी कधी तर ८०-१०० रूग्ण सोनोग्राफीसाठी जमतात.सोनोग्राफी तज्ज्ञ दुपारी २ पासून शेवटच्या रूग्णांची सोनोग्राफी होईपर्यंत थांबतात. ४-५ तासात ७०-८० रूग्णांची सोनोग्राफी करण्याच शिवधनुष्य ते लिलया पेलतात.पण दुर्देवाने या तोबा गर्दीमुळे आता हळू हळू सोनोग्राफीच्या रिपोर्टच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे.
      एखाद्या रूग्णाची सोनोग्राफी केल्यावर सदर गरोदर मातेच्या,आरोग्यसेविकेच्या व आशा कार्यकर्तीच्या मनांत (False Security) खोटी सुरक्षा निर्माण होते.सोनोग्राफी केली,रिपोर्ट व्यवस्थित आला ,आता आपली जबाबदारी संपली असे आशा व आरोग्यसेविकेला वाटते.तर गरोदर मातेलाही त्यानंतर नियमित पोटावरून तपासणी करण्याची गरज वाटत नाही.मग हे रूग्ण एकदम प्रसूतीवेदना सुरू झाल्यावर रूग्णालयात धाव घेतात.त्यातील काही रूग्णांनी दोन तीन वेळा सोनोग्राफी केलेली असते.परंतु  डाक्टरांकडून नियमित तपासणी मात्र अजिबात झालेली नसते.त्यामुळे अचानक काहातरी गुंतागुंत उद्भवते.उदाहरणार्थ खालील घडलेल्या काही सत्य घटना-
 १)एक दुस-या खेपेच्या मातेने आठव्या महिन्यात सोनोग्राफी केली. बाळ पायळू म्हणजे Breech Presetation  होते.रिपोर्ट कोणालाही न दाखवता ती निर्धास्त राहीली.एका रात्री तिला वेदना सुरू झाल्या.दुसरी खेप असल्याने तिने घरीच दाईकडून प्रसूती करण्याची ठरवल.साडेतीन किलो  वजनाच्या पायाळू बाळाची अप्रशिक्षित दाईला घरी प्रसूती करणे जमले नाही.बाळाचे पाय बाहेर व डोके अडकेल्या स्थितीत तिला कुटीर रूग्णालयात आणले जिथे प्रसूती झाली परंतु तोपर्यंत बाळ दगावले होते.
२) एका रूग्णाने नऊ महिन्यात तब्बल तीन वेळा सोनोग्राफी केली होती.प्रत्येक सोनोग्राफीत प्रसूतीची तारीख पुढची दाखवल्याने ती गोंधळली.दिवस उलटून गेल्यावर १५ दिवसानंतर ती बाळाची हालचाल होत नव्हती म्हणून तपासाण्यासाठी आली.पाणी कमी होऊन बाळ आतच दगावले होते.(Severe Oligohydramnios ,Intrauterine Foetal Death )
३) दुसरी एक रूग्ण नववा महिना लागल्यावर अंगावरून रक्त जाते म्हणून भरती झाली.तपासल्यावर असे कळले की बाळाची वार ( Placenta Previa ) पिशवीच्या तोंडावर होती.जे सहाव्या महिन्यात केलेल्या सोनोग्राफीत दिसले नव्हते.
४) एका रूग्णाची ५ व्या महिन्याची सोनोग्राफी Normal होती.परंतु प्रसूतीनंतर बाळाच्या पाठीच्या मणक्यात दोष व कण्यावर गाठ (Spina Bifida ,Meningomylocele )होती.जी सोनोग्राफीत दिसली नव्हती.
        यात तस म्हटल तर चूक कोणा व्यक्तीची नाही.चूक आहे आपण निर्माण केलेल्या  सोनोग्राफीच्या व्यवस्थेची आणि रूग्णांच्या अज्ञानाची.एक साधी सोनोग्राफी (Routine Obstetric Ultrasound) करायला किमान १० मिनटे व रिपोर्टींगला ५ म्हणजे एकूण १५ मिनीटे लागतात.म्हणजे तासाला फक्त ४-५ सोनोग्राफी होऊ शकतात.म्हणजे ५ तासात २५ रूग्णांच्या सोनोग्राफी होऊ शकतात.इथ सोनोग्राफी तज्ज्ञांना आपण पाच- सहा तासात ७०-८० रूग्णांची सोनोग्राफी करायला भाग पाडतो.म्हणजे ४-५ मिनीटांत एक सोनोग्राफी.या ४-५ मिनीटात संपूर्ण सोनोग्राफी करणे शक्य नाही.यामुळे घाई गडबडीत केलेल्या सोनोग्राफी तांत्रिक चुका होण्याची शक्यता बळकावते.मग वर उल्लेख केलेल्या घटना घडतात.
        दुसरा मुद्दा म्हणजे सोनोग्राफी का करायची असते या बद्दल असलेले रूग्णांचे,आशांचे,आरोग्यसेविकांचे आणि अगदी नवख्या वैद्यकिय अधिका-यांचे असलेले अज्ञान.कोणतेही तंत्र त्याचे जसे फायदे असतात ,तशाच मर्यादासुध्दा असतात.म्हणून हे सोनोग्राफीचे तंत्र जपून वापरायला हवे.तशी गरोदर मातेची सोनोग्राफी करण्याची २०-२१ कारणे आहेत.परंतु महत्वाची कारणे म्हणजे गर्भाची संख्या,गर्भाची वाढ,गर्भाची अवस्था,  गर्भाभोवतालचे पाणी,वारेची जागा,गर्भाचे वजन,गर्भाचे ठोके,गर्भातील व्यंग ही असतात.Routine Sonography त बाळाच्या डोक्याचा घेर व व्यास ,मांडीच्या हाडाची लांबी  व पोटाचा घेर मोजून गर्भाची वाढ आठवड्यात मोजतात.या व्यतिरिक्त इतर सोनोग्राफी खालील प्रमाणे करतात.
पहिल्या तीन महिन्यात (१२ आठवड्याच्या आत) केलेल्या सोनोग्राफी Dating Sonography असते.कारण यात आलेली प्रसूतीची अपेक्षित तारीख बिनचूक निघते.
१० व्या आठवड्या दरम्यान केलेल्या सोनोग्राफी Nuchal Translucency Scan असतो.यात गर्भाच्या मानेचे मोजमाप करून डोक्याच्या व पाठीच्या मणक्याच्या जन्मजात व्यंगांचे निदान करता येते.
१६-१८ आठवड्यात Anomaly Scan /Malformation Scan करून गर्भातील मोठी शारिरीक व्यंगे शोधता येऊ शकतात.
२४-२६ आठवड्यात Foetal 2D Echo करून गर्भाच्या ह्रदयात दोष (जन्मजात ह्रदय रोग)आहे की नाही याची खातरजमा करता येते.
३२ आठवड्यांच्या पुढे Biophysical Profile ही बाळाची हालचाल व श्वसनाचे मुल्यमापन करता येणारी सोनोग्राफी करता येते.किंवा Colour Doppler ही बाळाला मातेकडून होणा-या रक्तपुरवठ्याचे प्रमाण मोजता येईल अशी सोनोग्राफी करता येते.
 दुर्देवाने आपल्याकडे मात्र गरोदर मातेच्या पोटात दुखत असेल,कंबर दुखत असेल,खूप उलट्या होत असतील,पोटात खूप हालचाल होते असेल तर रूग्ण स्वःता येतात किंवा आशा/ANM/MO  त्यांना सोनोग्राफीला पाठवतात.किंवा कारण नसताना रूग्णाला दोन किंवा तीन वेळा सोनोग्राफी करायला लावतात.त्यातल्या त्यात मोखाड्याच्या रूग्णांच्या डोक्यात जर सोनोग्राफीच भूत गेल तर जोपर्यंत सोनोग्राफी होत नाही तोपर्यंत त्यांचे समाधान होत नाही. सोनोग्राफी करून पोट किंवा कंबर दुखणे थांबत नाही हे पहिल्यांदा आपल्या कर्मचारी-यांनी नीट समजून घ्यायला हव नि रूग्णांना पटवून द्यायला हव.तसेच पाचव्या सहाव्या महिन्यात सोनोग्राफी Normal आली म्हणजे पुढे काहीही गुंतागुंत होणारं नाही याची हमी नसते.सोनोग्राफी हा नियमित प्रसूतिपूर्व तपासणीचा पर्याय नाही. पहिल्या पाच महिन्यानंतर सोनोग्राफीवरून काढलेली प्रसूतीची अपेक्षित तारीख बिनचूक नसते.सोनोग्राफीत आठव्या महिन्यापर्यंत दाखवलेली गर्भाची  Position सतत बदल असते.
  वरील सर्व बाबी लक्षात घेऊन कोणाची सोनोग्राफी करायची नि कोणाची नाही याचा सांगोपांग विचार प्रत्येकाने करून मगच रूग्ण पाठवायला हवेत.जोखमीच्या मातांना सोनोग्राफीसाठी आधी प्राथमिकता द्यायला हवी. सर्व प्रा.आ. केंद्रांनी एक वेळापत्रक तयार करून त्यानुसार रूग्ण पाठवायला हवेत.एकावेळी ४० पेक्षा जास्त रूग्ण जमा होऊ नयेत अशी व्यवस्था करायला हवी. सोनोग्राफीचे तज्ज्ञ प्रसूती करणार नसतात.रिपोर्ट पाहून प्रसूती डाक्टर किंवा ANM/GNM ला करायची असते. सोनोग्राफी हा गरोदर मातेचा उपचार नाही.ती एक निदान करण्याची पध्दत आहे.तिचा योग्य वापर केला तरच तिचा सुलभ प्रसूतीसाठी उपयोग होईल. केवळ मोफत होते म्हणून सरसकट गावतल्या सगळ्यांची सोनोग्राफी करून संख्या वाढेल पण गुणवत्तेच काय?

Sunday, 27 August 2017

CASUALTY OPD चा ताण

                  कुठल्याही शासकिय रूग्णालयात किरकोळ आजार असलेले रूग्ण ज्याना रूग्णालयात भरती होण्याची गरज नसते, अशा रूग्णांची तपासणी बाह्यरुग्ण विभाग :- Outdoor Patient Department (OPD) मध्ये केली जाते.सर्वसाधारणपणे सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत व दुपारी ४ ते ६ ही  Morning व Evening OPD ची वेळ असते.या वेळात केसपेपर नोंदणी विभाग,औषधी विभाग,प्रयोगशाळा विभाग ,क्ष-किरण विभाग हे सर्व विभाग सुरू असतात.या वेळांव्यतिरिक्त किरकोळ आजारांचे रूग्ण तपासले जात नाहीत.बाकी गंभीर आजारी किंवा ज्यांना भरती करणे आवश्यक असते अशा रूग्णांसाठी Emergency Department :- तात्काळ विभाग २४ तास चालू असतो.
      परंतु गेल्या काही दिवसांपासून नियमित वेळांव्यतिरिक्तच्या Casualty OPD ची रूग्णसंख्या वाढलेली आहे. OPD च्या वेळेव्यतिरिक्त कुठल्याही वेळी किरकोळ आजाराचे रूग्ण येऊन गर्दी करतात.रविवारी किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी तर तोबा गर्दी होते.यावेळी तात्काळ विभागात फक्त एक वैद्यकिय अधिकारी व एक अधिपरिचारिका कामावर असतात.त्यांना ही गर्दी आवरणे मुश्कील जाते.त्या दोघांची स्थिती चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी होते .त्यांना अत्यवस्थ रूग्ण सोडून या किरकोळ आजाराच्या रूग्णांना तपासत बसावे लागते.
         अपघात,सर्पदंश,बिषबाधा झालेले रूग्ण,बेशुध्द रूग्ण,प्रसूतीचे रूग्ण,कमी वजनाची बालके,न्युमोनियाची व डायरियाची बालके,गॅस्ट्रो,मलेरिया,डेंग्यू,टायफॉईड यासारख्या साथीचे रूग्ण यांची अव्याहतपणे २४ तास भरती होत असते अशात Casualty OPD मुळे तात्काळ विभागात नाहक गोंधळ होतो.
     अगदी वैद्यकिय महाविद्यालयाशी संलग्न रूग्णालयापासून तर प्रा.आ.केंद्रापर्यंत OPDच्या वेळा व वार पाळले जातात.सुटीच्या दिवशी OPD सरसकट बंद ठेवतात.रूग्णांनाही हे माहीत असते.मग आपल्या रूग्णालयातच OPD २४ तास का सुरू राहते? या २४ तास उपलब्धतेचा स्थानिक व जवळ राहणा-या रूग्णांकडून गैरफायदा घेतला जातो.आपली घरची कामे,जेवण खाण आटोपून हे रूग्ण आरामात कुठल्याही वेळी डोकेदुखी,अंगदुखी,सर्दी अशा किरकोळ आजारासाठी गर्दी करतात.दुपारी २ ते ४ किंवा संध्याकाळी ६ ते रात्री ११ या वेळात हे स्थानिक रूग्ण येतात.सदर वेळात फक्त एकच वैद्यकिय अधिकारी कामावर असतो.यावेळी जर आपले अधिकारी एखादा गंभीर रूग्ण तपासत असले तरी हे रूग्ण स्वत:ला लवकर तपासावे या साठी तगादा लावतात किंवा नाहक घाई करतात.त्यासाठी अधिपरिचारिका किंवा अधिका-यांशी वाद घालतात.स्वत:च्या सोयीनुसार इंजेक्शन किंवा सलाईनची लावण्याची मागणी करतात.अशावेळी CMO वाद टाळावे म्हणून असे रूग्ण पटापट तपासून त्यांना वाटेला लावतात.पण दिवसेंदिवस अशा रूग्णांचे संख्या वाढत आहे.कुठलीही रांग न लावता ५ मिनिटात  तात्काळ सेवा मिळवण्याचा हा सोपा उपाय आहे हे सर्वांना ठाऊक झाले आहे.या सर्वांचा परिणाम तात्काळ विभागातील अत्यवस्थ रूग्णांना मिळणा-या उपचाराच्या गुणवत्तेवर होत आहे.त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवणे परिचारिका व वैद्यकिय अधिका-यांना शक्य होत नाही.
      लांबच्या खेड्यापाड्यातून मिळेल ते वाहन पकडून येणा-या गरीब रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून २४ तास देण्यासाठी रूग्णालय कटिबध्द आहे. पण आरोग्य संस्थेतील कर्मचारी व अधिकारी यांना कर्तव्य शिकवणा-या लोकांना समाज म्हणून त्यांची जबाबदारी काय आहे हे सांगणेही तितकेच गरजेचे आहे. जिल्हाधिकारी,तहसिलदार ,प्रांत किंवा गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अवेळी जाऊन काम न झाल्यामुळे कोणी गोंधळ घातल्याचे ऐकिवात नाही.पाणी कपातीच्या दिवशी कोणी नगरपालिकेत जाऊन जाब विचारत नाही. रस्त्यांची चाळणी झाली तरी कोणी बांधकाम विभागाकडे जाऊन कारण विचारत नाही. पण रूग्णालयात आल्यावर याच्यातला तथाकथित सुजाण नागरिक जागा होतो.मग तो आपल्याला कर्तव्याचे डोस पाजायचा प्रयत्न करतो.स्वत:ची नागरिक म्हणून काही जबाबदारी आहे याचा मात्र त्यांना सोईस्कर विसर पडतो. नियमांचा बडगा यांना दाखवावा लागेल.अन्यथा अति कामाच्या ताणाचे विपरीत परिणाम अधिका-यांवर व कर्मचा-यांवर होऊन आपली यंत्रणा डळमळीत होऊन आपल्या रूग्णालयाची अवस्था ग्रामीण रूग्णालय मोखाडा किंवा विक्रमगड सारखी  दयनीय व्हायला वेळ लागणार नाही.

Tuesday, 15 August 2017

एका रक्तपेढीची शोकांतिका

             सुमारे १७-१८ वर्षापूर्वी पतंगशाह कुटीर रूग्णालय ५४ खाटांचे असताना येथिल अतिदुर्गम भागातील रूग्णांची गरज लंक्षात घेऊन शासनाने रक्तपेढी सुरू केली.१४-१५ वर्षे अनंत अडचणी येऊनही ही रक्तपेढी चालू राहिली.कालांतराने रूग्णालय १०० खाटांचे झाले.प्रसूती व इतर रूग्णांच्या संख्येत चौपट वाढ झाली.त्याच हिशोबाने रक्ताची गरज असलेले रूग्णही वाढले.जवळपास शासकिय रक्तपेढी कुठेच नाही.जवळात जवळ नाशिक जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी ८० किलोमीटर , सिलव्हासा जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी ६५-७० किलोमीटर आणि ठाणे जिल्हा रूग्णालय रक्तपेढी तर ११०-१२० किलोमीटर ऐवढ्या दूरच्या अंतरावर आहे.या अशा बिकट परिस्थितीत पतंगशाह कुटीर रूग्णालयाच्या रक्तपेढीमुळे हजारो रूग्णांचे प्राण वाचले.रक्तसाठा नेहमी कमी पडायचा ,परंतु तरीही इकडे तिकडे जमेल त्या शाळा,कालेज किवा अगदी वाढदिवसा निमित्त वगैरे रक्तदान शिबीर आयोजित करून ही रक्तपेढी चालू होती.मनुष्यबळाचा अभाव,तज्ज्ञ रक्तसंक्रमण अधिका-याची वानवा,जुनी इमारत या बरोबरच अन्न व औषधी विभागाने घालून दिलेल्या अनेक कठोर निकषांची पूर्तता न केल्यामुळे या रक्तपेढीचा परवाना जून २०१४ ला रद्द केला गेला.त्या ऐवजी तात्पुरती सोय म्हणून ठाणे जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीच्या मदतीने रक्त साठा केंद्र सुरू करण्याची शिफारस अन्न व औषधी विभागाने केली.७-८ महिन्याच्या महत्प्रयासानंतर हे रक्त साठा केंद्र सुरू झाले.परंतु हे केंद्र सर्वस्वी ठाणे जिल्हा रूग्णालयाकडून मिळणा-या रक्त पिशव्यावर अवलंबून असते.१५-२० दिवसातून एक वेळा ज्या १०-१२ रक्तपिशव्या मिळतात त्या त्यांच्याकडे असलेल्या उपलब्धते नुसार मिळतात,आपल्या गरजेनुसार मिळत नाहीत.शिवाय आपण त्यांच्या परवानगी व सहकार्याशिवाय रक्तदान शिबीर आयोजित करू शकत नाही. एकूण काय तर स्वायत्त रक्तपेढीला असलेले अधिकार आपल्याला नाहीत.
            रक्तक्षयाच्या रूग्णांची संख्या लक्षात घेता दर महिन्याला आपल्याला ५०-६० रक्त पिशव्यांची गरज असते.म्हणजे रोज सरासरी दोन.परंतु आपल्याला मिळणा-या २०-२५ रक्तपिशव्यांवर गुजराण करावी लागते.आणीबाणीच्या वेळी रक्त उपलब्ध नसल्यास रक्त नाशिक किंवा पालघरच्या खाजगी रक्तपेढीतून प्रत्येक पिशवीमागे किमान २०००-२५०० रूपये खर्चून मागवावे लागते.परंतु ८०% रूग्णांना हे परवडत नाही.यासाठी आपल्या येथे सुसज्ज रक्तपेढी असणे गरजेचे आहे.जिथे आपल्याला रक्तपिशव्याचा जास्त साठा करता येईल.तसेच संपूर्ण रक्ता व्यतिरिक्त प्लाझमा,प्लेटलेट व पॅक सेल्स आदि रक्ताचे घटक साठवता येतील.तसेच कधीही ऐच्छिक रक्तदान घेता येईल.सुसज्ज यंत्रसामुग्री असल्यास रक्ताच्या संक्रमण करण्या आधीच्या विविध तपासण्या आपल्या येथेच करता येतील.सुदैवाने रोटरी इंटरनॅशन या NGO च्या लंडन व मुंबई या शाखांमार्फत सर्व अद्ययावत सामुग्री आपल्या प्रस्तावित नवीन रक्तपेढीसाठी मंजूर झाली आहे.याशिवाय सुसज्ज Blood Donation Van सुध्दा देण्याचे त्यांनी ठरवले आहे.परंतु कर्मदरिद्रीपणामुळे आपल घोड मात्र आहे तिथेच अडल आहे.
           नवीन रक्तपेढीच्या बांधकामाचा प्रस्ताव ५-६ वर्षापूर्वीच मंजूर झाला आहे.बांधकामासाठी जागेचे हस्तांतरण ४ वर्षापूर्वीच झाले आहे.प्रत्यक्ष काम सुरू होऊन साडेतीन वर्षे झाली आहेत.परंतु अजूनही या इमारतीचे १००% टक्के काम पूर्ण झालेले नाही.तळमजल्यावर रक्तपेढी व पहिल्या मजल्यावर प्रयोगशाळेचे नियोजन आहे.पहिल्या मजल्यावर स्लॅब मंजूर नाही ,पत्रे व फाल सिलिंग आहे.या एवढ्याशा कामाला जे सहा महिन्यात किंवा जास्तीत जास्त एक वर्षात व्हायला हवे, त्याला तीन वर्षापेक्षा जास्त अवधी लागला आहे.यावरून संबधित विभागाची कार्यतत्परता दिसून येते.तसेच हे काम हाती घेणा-या कंत्राटदाराचे सामाजिक भान व रूग्णांविषयीची कळकळ दिसून येते.एखाद्या रस्ताचे ,पूलाचे किंवा इतर सरकारी इमारतींचे बांधकाम वर्षानुवर्षे रखडवण्याचा जसा यांचा नेहमीचा पायंडा आहे,तोच पायंडा त्यांनी रक्तपेढीसारख्या आरोग्याशी निगडीत आणि विशेष म्हणजे रूग्णांच्या जीवन मरणाशी थेट संबधित असलेल्या कामाला लावावा ही दुर्देवाची बाब आहे.आधीच आपल्याकडे परिपूर्ण आरोग्य सुविधा असलेले मोठे दुसरे कुठलेही रूग्णालय जवळपास नाही. करोडपतीपासून तर दारिद्र्यरेषेखालील मजूरापर्यंत सर्वांना आणीबाणीच्या उपचारासाठी येथेच धाव घ्यावी लागते. त्यात या व्यवस्थेतील झारीतले शुक्राचार्य मंजूर कामेही धडावर नि वेळेत करत नसतील तर आमच्या भागात विकास किंवा सुधारणा होत नाहीत अशी बोंब मारण्यात काय अर्थ आहे? कंत्राटदारी व्यतिरिक्त राजकारण हा जोडधंदा असलेले लोकच बेंबीच्या देठापासून आदिवांसींवर अन्याय होतोय,सरकारचे दुर्लक्ष होतेय, आदिवांसी भागाचा विकास होत नाही असे रडगाणे रडतात.चांगले रस्ते,चांगल्या शाळा, भक्कम पूल, गावागावातली नळपाणी योजना,शेती साठी धरणे आदी पायाभूत सुविधांची कामे  घेणारे बहुतांशी लोक उपरे नसतात,इथलेच असतात.मग हे काम रेंगाळले तर दोष कोणाला द्यायचा?  बर या विषयावर आवाज उठवायला कुपोषणास्नेही माध्यमांना किंवा उपोषणस्नेही तथाकथित समाजसेवकांना वेळ नाही.
    सदर काम पूर्ण झाले की नाही? कधी पूर्ण होणार?  ऐवढा उशिर का लागतोय? यांची चौकशी नित्यनेमाने व उत्सुकतेने इंग्लंडच्या रोटरी इंटरनॅशनलचा महिंद्र ढाल नावाचा ८० वर्षांचा उत्साही तरूण आणि पश्चिम मुंबई रोटरीचे धडाडीचे माजी गव्हर्नर डॅा .बाळ इनामदार गेल्या ४ वर्षापासून अव्याहतपणे करत असतात.ज्यांच्याकडून आपल्या रक्तपेढीसाठी सर्व यंत्रसामुग्री दान म्हणून मिळणार आहे.त्यांच्या भाबड्या प्रश्नांना उत्तर देताना मला एकूणच आपल्या गेंड्याची कातडी असलेल्या व्यवस्थेची लाज वाटते.या माणसांना एवढ्या दूर राहूनसुध्दा आपल्या समाजासाठी काही करायची उर्मी आणि धडपड आहे.आणि आपण मात्र हताशपणे निर्ढावलेल्या कोडग्या व्यवस्थेत संवेदना गमावत चाललोय.
      कविवर्य ग.दि.माडगूळकरांच्या शब्दात सांगायचे तर हेच शब्द आठवतात-“देण्या-याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी.”

Monday, 24 July 2017

पतंगशाह कुटीर बाल व स्री रूग्णालय

                  

    
   मध्यंतरी वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांनी जव्हारला भेट दिली तेव्हा काही उत्साही लोकांनी त्यांच्याकडे येथील १०० खाटांच्या उपजिल्हा दर्जा असलेल्या पतंगशहा कुटीर रूग्णालयाचे वैद्यकिय महाविद्यालय करण्याबाबत मागणी केली.शिवाय ती मागणी मंत्री महोदयांनी तात्काळ मान्य केल्याचे वृत्त काही वृत्तपत्रात छापून सुध्दा आणले गेले.पण १०० खाटांच्या रूग्णालयाचे कमीत कमी ४००-५०० खाटांची क्षमता असलेल्या वैद्यकिय महाविद्यालयात (Medical College) मध्ये रूपांतर करणे एवढे सोपे आहे का? खरच त्याची गरज आहे काय? नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे?
       जव्हार,विक्रमगड व मोखाडा या तीन तालुक्यांतील साधारणपणे चार लाख लोकसंख्येसाठी हे ऐकमेव प्रथम संदर्भ सेवा रूग्णालय आहे.या तीन तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्यकेंद्र आहेत.परंतु तिथे  मुख्यत्वे करून प्रतिबंधात्मक इलाज होतात.शिवाय तिथे प्राथमिक उपचार करून रूग्ण ग्रामीण रूग्णालय किंवा उपजिल्हा रूग्णालयात संदर्भित करणे अपेक्षित असते. जिथे वेगवेगळ्या आजाराचे रूग्ण भरती करून त्यावर उपलब्धतेनुसार विशेषज्ञांकडून उपचार होतात.यातील मोखाडा व विक्रमगड ही ग्रामीण रूग्णालयांची क्षमता पुढ्च्या कमीत कमी १०-१५ वर्षांत वाढणे अशक्य आहे. स्थानिकांचा अवाजवी हस्तक्षेप आणि नाकर्ते अधिकारी या दुष्टचक्रामुळे आधीच तिथे स्थिती बिकट आहे.
         यामुळे कुटीर रूग्णालय जव्हार मध्ये बाह्य व आंतररूग्ण विभागात येणा-या रूग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. क्षमता १०० खाटांची असली तरी भरती रूग्ण १५० च्या आसपास असतात,पावसाळयात तर ही संख्या २०० च्या वर जाते.एका खाटेवर २ मोठे रूग्ण किंवा ३ बालके घ्यावी लागतात.त्यात पाण्याचे दुर्भिक्ष.रूग्णांना पिण्यासाठीच पाणी मिळणे मुश्कील तर आंघोळ किंवा प्रातर्विधीसाठी तर विचारायलाच नको.
            २०० खाटांचा प्रस्ताव गेल्या पाच वर्षांपासून मंजुरी विना रखडलेला आहे. सुमारे बारा वर्षापूर्वी १०० खाटांचे रूग्णालय व्हावे यासाठी सामिजक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मंजुरी लवकर मिळून अंमलबजावणीही लवकर झाली.परंतु यावेळेस हा प्रश्न कोणी तेवढासा लावून धरलेला दिसत नाही.आरोग्यसेवेची नकारात्मक बाजू छापण्यात अतिउत्साह दाखवणा-या प्रसारमाध्यमांनी तर या बाबींकडे  साफ दुर्लक्षच केले आहे.एखाद्या रूग्णालयाला टाळा वगैरे ठोकण्याच्या बातम्या त्यांना एखाद्या रूग्णालयाच्या सबलीकरणाच्या किंवा श्रेणीवर्धनाच्या प्रश्नापेक्षा जास्त महत्वाच्या वाटत असाव्यात . २०० खाटांच्या मंजुरीचे घोंगडे भिजत पडलेले असताना मेडिकल कालेजचे स्वप्न पहाणे म्हणजे हवेत मनोरे बांधण्यासारखे आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या मेडीकल कालेजांची MCI (Medical Council of India) नी काढलेल्या त्रुटी पूर्ण करता करता दमछाक होत आहे.  आपल्या इथे प्रा.आ.केंद्रात डाक्टर मिळणं दुरापास्त आहे,तर Medical College ला प्रत्येक विषयाचे विशेषज्ञ शिक्षक कुठून आणणार.शिवाय प्रश्न जमीनीचाही आहे.१०० खाटांची मंजुरी मिळाली तेव्हा नवीन रूग्णालय उभे करता यावे यासाठी नगर परिषदेकडे ४-५ एकर जमीन मागण्यात आली होती परंतु तेवढी रिकामी जमीन नसल्यामुळे ती मिळाली नव्हती.मेडीकल कालेजला तर कमीत कमी १० ते १५ एकर सखल जमीन लागेल.सरकार दरबारी शहरात ऐवढा मोठा रिक्त भूखंड नाही.खाजगी मालकीच्या जमीनीचे अधिग्रहण करणे तेवढे सोपे नाही.
        पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन तीन वर्षे झाली परंतु जिल्हा रूग्णालयाची निर्मिती अजून कागदावरच आहे.या स्थितीत जव्हारला २०० खाटांचे रूग्णालय मंजूर होणे जास्त गरजेचे आहे. येथिल वाढत्या बालमृत्यूदराचा विचार करता माता व बालकांना आरोग्यसेवा अजून सुरळीत मिळण्यासाठी १०० अतिरिक्त खाटांचे वेगळे ‘माता व बाल रूग्णालय’ मंजूर व्हायला हवे.शिवाय कमी वजनाच्या व अत्यवस्थ नवजात बालकांच्या ‘विशेष नवजात बाल कक्षाची क्षमता ५० वार्मरची असायला हवी. या बरोबरच कुपोषित बालकांसाठी असलेल्या NRC (Nutritional Rehabilitation Centre) ची क्षमता २५ खाटांची असायला हवी. या सर्व मंजुरी बरोबरच मुबलक पाण्याची सोय , अतिरिक्त मनुष्यबळ व नवीन इमारत उभी राहील्यास पुढील १० ते १५ वर्षातील वाढणा-या रूग्णांचा व्यवस्थित इलाज करता येईल.
     या सर्व मागण्या मंजूर झाल्यास कुपोषण,बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्याच्या दिशेने हे आश्वासक पाऊल असेल.

Wednesday, 12 July 2017

कुपोषण देगा देवा

           जून महिन्यात 'नेमेचि येतो मग पावसाळा ' ही उक्ती इथे 'नेमेचि येते मग कुपोषण' अशी वापरायला हवी.दिवाळी झाल्यावर कुपोषण हा शब्द कमी वेळा बोलण्यात,ऐकण्यात किंवा वाचण्यात येतो.मग जून मध्येच एखाद्या संसर्गजन्य आजाराच्या उद्रकासारखा हा शब्द ऐकिवात येतो.सर्व सरकारी व बिगर सरकारी यंत्रणा युध्द पातळींवर कामाला लागूनही कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण हवे तेवढ्या प्रमाणात कमी होत नाही.याचे प्रमुख कारण म्हणजे करण्यात येणा-या जवळपास सर्व उपायात कुपोषण झाल्यावर त्यावर पोषण करून इलाज करण्यावर जास्त भर दिला गेला आहे.पण प्रतिबंधावर जास्त भर दिला गेलेला नाही.
              प्रतिबंधाची सुरवात किशोरवयीन मुलींपासून करावी लागेल , वयं वर्षे ११ ते १९ वयोगटातील मुलींच्या पोषणावर लक्ष द्यावे लागेल.या वयोगटातील ३०-३५ किलोच्या मुली  ३ किलोच्या सुदृढ बालकाला जन्म देऊ शकत नाहीत.गर्भारपणात या मुलींचे वजन फक्त ४-५ किलोच वाढते.इथूनच गर्भाच्या कुपोषणाची सुरवात होते.१८ वर्षाखालील मुलींची लग्ने अथवा गर्भारपण राहू नये यासाठी सामाजिक व राजकीय प्रयत्न होताना दिसत नाहीत,किंबहुना तशी राजकीय समज व इच्छाशक्ती कोणत्याही राजकीय पक्षात नाही. ब-याच बिगर सरकारी सामाजिक संस्था येथे काम करत आहेत ,परंतु या विषयावर कोणीही काम करत नाही.सरकारी पातळीवर ARSH-Adolescent Reproductive Sexual Health हा कार्यक्रम चालू आहे,परंतु  वेगळ्या मनुष्यबळाअभावी व्यापक प्रमाणावर त्याची अंमलबजावणी होत नाही.
               दुसरा महत्वाचा मुद्दे म्हणजे शिक्षण.इयत्ता दहावी पर्यंत शाळेतून गळती होणा-या मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे.प्राथमिक शाळेतून गळती झालेल्या मुली पुढे पडेल ते काम करून कुटुंबाला मदत करतात.त्यातच त्यांची १८ वर्ष पूर्ण होण्याआधी लग्न किंवा Mutual Living Relationship मध्ये गुरफटतात.किमान १० वी किंवा १२ वी पास असलेल्या मुली स्वत:च्या व कुटुंबाच्या आरोग्याच्या बाबतीत सजग असतात.त्यामुळे या कुटुंबात कुपोषणाचे प्रमाण नगण्य असते.त्यामुळे सर्व शिक्षा अभियान जर सर्व मुलींपर्यंत पोचले तर कुपोषणाचा आपोआप प्रतिबंध होईल.
              तिसरीत मु्द्दा आहे आहे,रोजगार व दळणवळणाचा.इथेच रोजगार निर्माण करायचा असेल तर बागायती शेतीला प्राधान्य द्यावे लागेल.पाणी साठवून भात व नाचणी व्यतिरिक्त इतर पिके घेण्यावर भर द्यावे लागेल.या शेतमालासाठी मुंबई ,ठाण्यापेक्षा तुलनेने जवळ असलेल्या सिलवासा किंवा नाशिक या बाजारपेठा जवळ आहेत.ही दोन्ही शहरे अद्ययावत महामार्गाने जव्हारच्या अजून जवळ येऊ शकतात. मुंबईला जाण्यात ३-४ तास घालवण्यापेक्षा एक तासात सेलवास,दिड तासात वापी किंवा नाशिक हे जास्त सोईस्कर होईल.ही शहरे जवळ आली तर तिथल्या उद्योगाला येथिल मनुष्यबळ पुरवतां येईल. रोजगारासाठी लांबवर स्थलांतर कराव लागणारे नाही.पण दुर्देवाने  रस्ते  हवे तेवढे चांगले नाहीत.
                आहे त्या परिस्थितीत वर्षोनुवर्षे राहून इथल्या लोकांची जगण्यासाठी संघर्ष करण्याची इच्छाच  नाहीशी झालेली दिसत.जीवनमान उंचावण्यासाठी जाणीवपूर्व प्रयत्न करण्याची उर्मी या समाजात नाही.अस्वच्छ पाणी पिऊन  हागवण झालेले रूग्ण बरे झाल्यावर निदान घरी जाऊन पाणी गाळून उकळून पाणी पिणे अपेक्षित असते  परंतु दुर्देवाने असे  अजून तरी होत नाही. तसेच विविध सरकारी योजनांनी हे लोक इतके परावलंबी झाले आहेत की स्वःताचे आरोग्य सांभाळणे ही सरकारची जबाबदारी आहे असा  यांचा ठाम समज आहे. कुपोषित बालक वजन वाढण्यासाठी NRC-Nutrition Rehabilitation Centre ला भरती केल्यास बुडीत मजुरी मिळते. काम न करता केवळ भरती करण्याचे पैसे मिळतात म्हणून बालके भरती केली जातात.या पैशांचा विनीयोग दारू पिण्यासाठी केला जातो.मोफतच्या औषधी,अन्न व पैशांच्या मदतीने आरोग्याबाबत कमालीची बेफिकीरी व अनास्था आहे.लग्न,साखरपुडा  किंवा बोहाडा या वेळी दारू,ताडी,मानपान किंवा रितीरिवाज यावर खर्च करणे जेवढे अत्यावश्यक मानले जाते ,तेवढे लहान बालकांच्या जेवणा खाण्यावर लक्ष देणे त्यांना गरजेचे वाटत नाही.
      दरवर्षी कुपोषणामुळे प्रसारमाध्यमांचे  मात्र चांगलेच पोषण होते.त्यांच्यात आकडेवारीची मग स्पर्धा लागते. फोटो काढण्यासाठी जास्त हडकुळ्या दिसणा-या बालकाचा हटकून शोध घेतला जातो.मग चित्र असे काही रंगवले जाते की इथली ९०% बालक कुपोषित आहेत.हे सगळं कमी की काय म्हणून एखाद्या चांगल्या वजनाच्या बालकाला रुग्णालयात इतर आजारासाठी जेव्हा भरती केले जाते व जेव्हा बुडीत मजुरी मिळत नाही तेव्हा त्याचे पालक कुरकुरतात  की -"असा  कसा पैसे त मिळायलच पायजत,कुपुसित आहे तो'!"

प्रसूतीपश्चात तांबी कार्यक्रमाची तोकडी लांबी

                     फार पूर्वी म्हणजे मध्ययुगीन काळात अरब व्यापारी लोक एका वाळवंटी प्रदेशातून दुस-या प्रदेशात आपल्याकडील उंटांच्या ताफ्यासह...