Sunday, 27 August 2017

CASUALTY OPD चा ताण

                  कुठल्याही शासकिय रूग्णालयात किरकोळ आजार असलेले रूग्ण ज्याना रूग्णालयात भरती होण्याची गरज नसते, अशा रूग्णांची तपासणी बाह्यरुग्ण विभाग :- Outdoor Patient Department (OPD) मध्ये केली जाते.सर्वसाधारणपणे सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत व दुपारी ४ ते ६ ही  Morning व Evening OPD ची वेळ असते.या वेळात केसपेपर नोंदणी विभाग,औषधी विभाग,प्रयोगशाळा विभाग ,क्ष-किरण विभाग हे सर्व विभाग सुरू असतात.या वेळांव्यतिरिक्त किरकोळ आजारांचे रूग्ण तपासले जात नाहीत.बाकी गंभीर आजारी किंवा ज्यांना भरती करणे आवश्यक असते अशा रूग्णांसाठी Emergency Department :- तात्काळ विभाग २४ तास चालू असतो.
      परंतु गेल्या काही दिवसांपासून नियमित वेळांव्यतिरिक्तच्या Casualty OPD ची रूग्णसंख्या वाढलेली आहे. OPD च्या वेळेव्यतिरिक्त कुठल्याही वेळी किरकोळ आजाराचे रूग्ण येऊन गर्दी करतात.रविवारी किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी तर तोबा गर्दी होते.यावेळी तात्काळ विभागात फक्त एक वैद्यकिय अधिकारी व एक अधिपरिचारिका कामावर असतात.त्यांना ही गर्दी आवरणे मुश्कील जाते.त्या दोघांची स्थिती चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी होते .त्यांना अत्यवस्थ रूग्ण सोडून या किरकोळ आजाराच्या रूग्णांना तपासत बसावे लागते.
         अपघात,सर्पदंश,बिषबाधा झालेले रूग्ण,बेशुध्द रूग्ण,प्रसूतीचे रूग्ण,कमी वजनाची बालके,न्युमोनियाची व डायरियाची बालके,गॅस्ट्रो,मलेरिया,डेंग्यू,टायफॉईड यासारख्या साथीचे रूग्ण यांची अव्याहतपणे २४ तास भरती होत असते अशात Casualty OPD मुळे तात्काळ विभागात नाहक गोंधळ होतो.
     अगदी वैद्यकिय महाविद्यालयाशी संलग्न रूग्णालयापासून तर प्रा.आ.केंद्रापर्यंत OPDच्या वेळा व वार पाळले जातात.सुटीच्या दिवशी OPD सरसकट बंद ठेवतात.रूग्णांनाही हे माहीत असते.मग आपल्या रूग्णालयातच OPD २४ तास का सुरू राहते? या २४ तास उपलब्धतेचा स्थानिक व जवळ राहणा-या रूग्णांकडून गैरफायदा घेतला जातो.आपली घरची कामे,जेवण खाण आटोपून हे रूग्ण आरामात कुठल्याही वेळी डोकेदुखी,अंगदुखी,सर्दी अशा किरकोळ आजारासाठी गर्दी करतात.दुपारी २ ते ४ किंवा संध्याकाळी ६ ते रात्री ११ या वेळात हे स्थानिक रूग्ण येतात.सदर वेळात फक्त एकच वैद्यकिय अधिकारी कामावर असतो.यावेळी जर आपले अधिकारी एखादा गंभीर रूग्ण तपासत असले तरी हे रूग्ण स्वत:ला लवकर तपासावे या साठी तगादा लावतात किंवा नाहक घाई करतात.त्यासाठी अधिपरिचारिका किंवा अधिका-यांशी वाद घालतात.स्वत:च्या सोयीनुसार इंजेक्शन किंवा सलाईनची लावण्याची मागणी करतात.अशावेळी CMO वाद टाळावे म्हणून असे रूग्ण पटापट तपासून त्यांना वाटेला लावतात.पण दिवसेंदिवस अशा रूग्णांचे संख्या वाढत आहे.कुठलीही रांग न लावता ५ मिनिटात  तात्काळ सेवा मिळवण्याचा हा सोपा उपाय आहे हे सर्वांना ठाऊक झाले आहे.या सर्वांचा परिणाम तात्काळ विभागातील अत्यवस्थ रूग्णांना मिळणा-या उपचाराच्या गुणवत्तेवर होत आहे.त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवणे परिचारिका व वैद्यकिय अधिका-यांना शक्य होत नाही.
      लांबच्या खेड्यापाड्यातून मिळेल ते वाहन पकडून येणा-या गरीब रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून २४ तास देण्यासाठी रूग्णालय कटिबध्द आहे. पण आरोग्य संस्थेतील कर्मचारी व अधिकारी यांना कर्तव्य शिकवणा-या लोकांना समाज म्हणून त्यांची जबाबदारी काय आहे हे सांगणेही तितकेच गरजेचे आहे. जिल्हाधिकारी,तहसिलदार ,प्रांत किंवा गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अवेळी जाऊन काम न झाल्यामुळे कोणी गोंधळ घातल्याचे ऐकिवात नाही.पाणी कपातीच्या दिवशी कोणी नगरपालिकेत जाऊन जाब विचारत नाही. रस्त्यांची चाळणी झाली तरी कोणी बांधकाम विभागाकडे जाऊन कारण विचारत नाही. पण रूग्णालयात आल्यावर याच्यातला तथाकथित सुजाण नागरिक जागा होतो.मग तो आपल्याला कर्तव्याचे डोस पाजायचा प्रयत्न करतो.स्वत:ची नागरिक म्हणून काही जबाबदारी आहे याचा मात्र त्यांना सोईस्कर विसर पडतो. नियमांचा बडगा यांना दाखवावा लागेल.अन्यथा अति कामाच्या ताणाचे विपरीत परिणाम अधिका-यांवर व कर्मचा-यांवर होऊन आपली यंत्रणा डळमळीत होऊन आपल्या रूग्णालयाची अवस्था ग्रामीण रूग्णालय मोखाडा किंवा विक्रमगड सारखी  दयनीय व्हायला वेळ लागणार नाही.

No comments:

Post a Comment

प्रसूतीपश्चात तांबी कार्यक्रमाची तोकडी लांबी

                     फार पूर्वी म्हणजे मध्ययुगीन काळात अरब व्यापारी लोक एका वाळवंटी प्रदेशातून दुस-या प्रदेशात आपल्याकडील उंटांच्या ताफ्यासह...