मध्यंतरी वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांनी जव्हारला भेट दिली तेव्हा काही उत्साही लोकांनी त्यांच्याकडे येथील १०० खाटांच्या उपजिल्हा दर्जा असलेल्या पतंगशहा कुटीर रूग्णालयाचे वैद्यकिय महाविद्यालय करण्याबाबत मागणी केली.शिवाय ती मागणी मंत्री महोदयांनी तात्काळ मान्य केल्याचे वृत्त काही वृत्तपत्रात छापून सुध्दा आणले गेले.पण १०० खाटांच्या रूग्णालयाचे कमीत कमी ४००-५०० खाटांची क्षमता असलेल्या वैद्यकिय महाविद्यालयात (Medical College) मध्ये रूपांतर करणे एवढे सोपे आहे का? खरच त्याची गरज आहे काय? नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे?
जव्हार,विक्रमगड व मोखाडा या तीन तालुक्यांतील साधारणपणे चार लाख लोकसंख्येसाठी हे ऐकमेव प्रथम संदर्भ सेवा रूग्णालय आहे.या तीन तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्यकेंद्र आहेत.परंतु तिथे मुख्यत्वे करून प्रतिबंधात्मक इलाज होतात.शिवाय तिथे प्राथमिक उपचार करून रूग्ण ग्रामीण रूग्णालय किंवा उपजिल्हा रूग्णालयात संदर्भित करणे अपेक्षित असते. जिथे वेगवेगळ्या आजाराचे रूग्ण भरती करून त्यावर उपलब्धतेनुसार विशेषज्ञांकडून उपचार होतात.यातील मोखाडा व विक्रमगड ही ग्रामीण रूग्णालयांची क्षमता पुढ्च्या कमीत कमी १०-१५ वर्षांत वाढणे अशक्य आहे. स्थानिकांचा अवाजवी हस्तक्षेप आणि नाकर्ते अधिकारी या दुष्टचक्रामुळे आधीच तिथे स्थिती बिकट आहे.यामुळे कुटीर रूग्णालय जव्हार मध्ये बाह्य व आंतररूग्ण विभागात येणा-या रूग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. क्षमता १०० खाटांची असली तरी भरती रूग्ण १५० च्या आसपास असतात,पावसाळयात तर ही संख्या २०० च्या वर जाते.एका खाटेवर २ मोठे रूग्ण किंवा ३ बालके घ्यावी लागतात.त्यात पाण्याचे दुर्भिक्ष.रूग्णांना पिण्यासाठीच पाणी मिळणे मुश्कील तर आंघोळ किंवा प्रातर्विधीसाठी तर विचारायलाच नको.
२०० खाटांचा प्रस्ताव गेल्या पाच वर्षांपासून मंजुरी विना रखडलेला आहे. सुमारे बारा वर्षापूर्वी १०० खाटांचे रूग्णालय व्हावे यासाठी सामिजक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मंजुरी लवकर मिळून अंमलबजावणीही लवकर झाली.परंतु यावेळेस हा प्रश्न कोणी तेवढासा लावून धरलेला दिसत नाही.आरोग्यसेवेची नकारात्मक बाजू छापण्यात अतिउत्साह दाखवणा-या प्रसारमाध्यमांनी तर या बाबींकडे साफ दुर्लक्षच केले आहे.एखाद्या रूग्णालयाला टाळा वगैरे ठोकण्याच्या बातम्या त्यांना एखाद्या रूग्णालयाच्या सबलीकरणाच्या किंवा श्रेणीवर्धनाच्या प्रश्नापेक्षा जास्त महत्वाच्या वाटत असाव्यात . २०० खाटांच्या मंजुरीचे घोंगडे भिजत पडलेले असताना मेडिकल कालेजचे स्वप्न पहाणे म्हणजे हवेत मनोरे बांधण्यासारखे आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या मेडीकल कालेजांची MCI (Medical Council of India) नी काढलेल्या त्रुटी पूर्ण करता करता दमछाक होत आहे. आपल्या इथे प्रा.आ.केंद्रात डाक्टर मिळणं दुरापास्त आहे,तर Medical College ला प्रत्येक विषयाचे विशेषज्ञ शिक्षक कुठून आणणार.शिवाय प्रश्न जमीनीचाही आहे.१०० खाटांची मंजुरी मिळाली तेव्हा नवीन रूग्णालय उभे करता यावे यासाठी नगर परिषदेकडे ४-५ एकर जमीन मागण्यात आली होती परंतु तेवढी रिकामी जमीन नसल्यामुळे ती मिळाली नव्हती.मेडीकल कालेजला तर कमीत कमी १० ते १५ एकर सखल जमीन लागेल.सरकार दरबारी शहरात ऐवढा मोठा रिक्त भूखंड नाही.खाजगी मालकीच्या जमीनीचे अधिग्रहण करणे तेवढे सोपे नाही.
पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन तीन वर्षे झाली परंतु जिल्हा रूग्णालयाची निर्मिती अजून कागदावरच आहे.या स्थितीत जव्हारला २०० खाटांचे रूग्णालय मंजूर होणे जास्त गरजेचे आहे. येथिल वाढत्या बालमृत्यूदराचा विचार करता माता व बालकांना आरोग्यसेवा अजून सुरळीत मिळण्यासाठी १०० अतिरिक्त खाटांचे वेगळे ‘माता व बाल रूग्णालय’ मंजूर व्हायला हवे.शिवाय कमी वजनाच्या व अत्यवस्थ नवजात बालकांच्या ‘विशेष नवजात बाल कक्षाची क्षमता ५० वार्मरची असायला हवी. या बरोबरच कुपोषित बालकांसाठी असलेल्या NRC (Nutritional Rehabilitation Centre) ची क्षमता २५ खाटांची असायला हवी. या सर्व मंजुरी बरोबरच मुबलक पाण्याची सोय , अतिरिक्त मनुष्यबळ व नवीन इमारत उभी राहील्यास पुढील १० ते १५ वर्षातील वाढणा-या रूग्णांचा व्यवस्थित इलाज करता येईल.
या सर्व मागण्या मंजूर झाल्यास कुपोषण,बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्याच्या दिशेने हे आश्वासक पाऊल असेल.